कोरची : जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
– हत्या की अपघात ?
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०२ : तालुक्यातील कोटरा ते बोगटोला रोडलगत असलेल्या तलावाजवळ अर्धवट मातीखाली गाडलेल्या अवस्थेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे वय अंदाजे २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे हा मृत्यू अपघाती आहे की घातपाताचा असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
२१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान सदर घटना घडल्याचा अंदाज असून, ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.१४ वाजता कोरची पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. मुलेटिपदीकसा येथील पोलीस पाटील ईश्वरदास सत्तर कल्लो यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी गावकऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली असता, तलावाच्या उत्तरेस सुमारे १६ मीटर अंतरावर सदर मृतदेह अर्धवट मातीने झाकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतकाने पॅन्ट व शर्ट परिधान केलेले असून, दोन्ही हातांत कडे होते. चेहरा पूर्णतः काळवंडलेला असून, शरीरावर अळ्या लागल्याने मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मृतदेह मातीखाली लपविण्याचा प्रयत्न झाल्याचे दृश्य पाहता हा प्रकार अपघात नसून हत्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मृतकाची ओळख न पटल्याने तसेच नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट असल्याने पोलीस सर्व शक्यतांचा तपास करीत आहेत.
या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू असून, मृतकाची ओळख पटविणे, शवविच्छेदन अहवालाच्या आधारे मृत्यूचे कारण स्पष्ट करणे आणि हा प्रकार हत्या आहे की अपघात, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत असून, प्रभारी पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi #Korch iPolice #Gadchiroli #SuspiciousDeath #UnidentifiedBody #CrimeNews #MurderOrAccident #PoliceInvestigation #BreakingNews #RuralCrime #MaharashtraNews














