आरमोरी : १० वर्षीय चिमुकल्याने घेतला गळफास
– गावामध्ये खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : गरिबीचे चटके, आई-वडिलांचे स्थलांतर आणि त्यातून आलेले असह्य एकाकीपण… या साऱ्या परिस्थितीचा भार एका कोवळ्या जीवाला सहन न होऊन त्याने मृत्यूला कवटाळल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या संस्कार विनोद कन्नाके (वय १०) या बालकाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
संस्कारचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात मजुरीसाठी गेले होते. त्यामुळे तो घरी एकटाच राहत होता. रविवारी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. इतक्या लहान वयात त्याच्या मनात नेमके कोणते वादळ उठले होते, कोणती विवंचना त्याला मृत्यूच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेली, याचे उत्तर अद्याप अनुत्तरितच आहे.
घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत संस्कारचा निष्प्राण देह दिसताच गावकऱ्यांनी आक्रोश केला. या घटनेची माहिती तातडीने पोलीस पाटील माधुरी सहारे यांनी आरमोरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
संस्कारच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पालकांचे स्थलांतर, त्यातून आलेले एकटेपण किंवा शाळेतील एखादा प्रसंग त्याच्या मानसिक नैराश्यास कारणीभूत ठरला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. गरिबीमुळे आई-वडिलांना दूर राहावे लागणे आणि त्याच गरिबीच्या छायेत एका निष्पाप बालकाचा असा अंत होणे, या वास्तववादी शोकांतिकेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास आरमोरी पोलीस करीत असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूमागील नेमके गूढ उकलण्याची शक्यता आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #aramori














