७९ वर्षांनंतर तुमरकोठीत एस.टी. बसची एंट्री
-अहेरी मार्गावर बससेवा सुरू होताच ग्रामस्थांचा जल्लोष
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : माओवादग्रस्त आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील तुमरकोठी परिसरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर एस.टी. बससेवा सुरू झाली असून गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी आणि त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल विविध उपक्रम राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
भामरागडपासून सुमारे ३० कि.मी. आणि अहेरीपासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या तुमरकोठी येथे प्रथमच एस.टी. बस पोहोचताच गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात नृत्य करत बसचे जल्लोषात स्वागत केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन बसचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तुमरकोठी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ सुरासे यांनी हिरवा झेंडा दाखवून बससेवेचे उद्घाटन केले आणि बस मार्गस्थ केली.
या प्रसंगी ग्रामपंचायत कोठीच्या सदस्य श्रीमती भाग्यश्री लेकामी, गावपाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी, राजू गावडे तसेच जि.प. शाळेचे शिक्षक रामा लेकामी यांच्यासह सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते. तुमरकोठी – कोठी – भामरागड – अहेरी या मार्गावर सुरू झालेल्या या बससेवेचा लाभ परिसरातील तुमरकोठी, तोयनार, मुरुमभुशी व इतर दुर्गम गावांतील सुमारे ४५० ते ५०० नागरिकांना होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांची रोजची पायपीट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
दरम्यान, दुर्गम भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्ह्यात आतापर्यंत ५५९ मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले असून ४२४ कि.मी. रस्ते आणि ६५ पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मागील वर्षभरात गट्टा (जा.)–गर्देवाडा–वांगेतुरी, कटेझरी–गडचिरोली, मरकणार–अहेरी आणि आंबेझरी–गडचिरोली या मार्गांवरही प्रथमच बससेवा सुरू करण्यात आली असून दुर्गम भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या मूलभूत समस्यांवर उपाय करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सातत्याने प्रयत्न करत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे.
या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ १९१ बटालियनचे अधिकारी, तुमरकोठी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
#thegdv #thegadvishva #Gadchiroli | Aheri | Bhamragad | ST Bus Service | Gadchiroli Police













