कुंभार समाजाच्या हक्काच्या जागेवर सांडपाणी प्रकल्प?; १५ दिवसांत तीव्र आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १६ : कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रस्तावित विकास आराखड्यात (डीपी) कुंभार समाजाच्या पारंपरिक माती खाणीच्या जागेवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आरक्षित करण्यात आल्याने समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर आणि उपजीविकेवर गदा येणार असल्याचा आरोप करत ‘कुंभार समाज कुरखेडा’ संघटनेने नगर पंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर करून संबंधित आरक्षण तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १५ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कुंभिटोला रोडलगत असलेल्या सर्वे क्रमांक ५/१ मधील जागा अनेक दशकांपासून कुंभार समाज माती काढण्यासाठी वापरत आहे. या जागेवर आधारित मातीची भांडी व इतर पारंपरिक व्यवसाय करून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. महसूल अभिलेख तसेच ७/१२ उताऱ्यावरही या जागेची ‘माती खाण’ म्हणून नोंद असल्याचे समाजाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
मात्र, प्रशासनाने या वास्तवाकडे दुर्लक्ष करून त्याच जागेवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केल्याने कुंभार समाजाच्या पारंपरिक आणि कायदेशीर हक्कांवर गदा आली असल्याची भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. यामुळे समाजाच्या उपजीविकेचे साधन हिरावले जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
निवेदनाद्वारे सर्वे क्र. ५/१ वरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आरक्षण तात्काळ रद्द करावे, विकास आराखड्यात कुंभार समाजाच्या ‘माती खाण’ क्षेत्राची स्वतंत्र नोंद करावी तसेच सुधारित आराखडा अंतिम करण्यापूर्वी समाजाची रीतसर सुनावणी घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, निवेदन प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास धरणे आंदोलन, उपोषण, मोर्चा तसेच न्यायालयीन लढा उभारला जाईल, असा स्पष्ट इशारा कुंभार समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर समाजातील अनेक प्रमुख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून, या प्रश्नामुळे कुरखेडा परिसरातील राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.













