धानोरा तालुक्यात तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करा : दिवाकर भोयर यांची मागणी

20

धानोरा तालुक्यात तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करा : दिवाकर भोयर यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १४ : धानोरा तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर मका पिकाचे उत्पादन होत असतानाही शासकीय खरेदी केंद्राचा अभाव असल्याने शेतकऱ्यांसमोर विक्रीचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी दिवाकर भोयर यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वाढता उत्पादन खर्च, पाण्याची कमतरता आणि भारनियमनाच्या समस्येमुळे शेतकऱ्यांनी धान पिकाला पर्याय म्हणून कमी पाण्यात येणाऱ्या मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. यंदा तालुक्यात मका उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून पीक हाती येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊस, वादळ आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाच बाजारपेठेअभावी त्यांची अडचण अधिकच वाढली आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडून आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे कारण पुढे करत कमी दरात मका खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.
धानोरा तालुक्यात अद्याप शासकीय आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत मका खरेदीस परवानगी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घेत मका खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिवाकर भोयर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here