कुरखेडा : अवैध गोवंश तस्करी उघड,पिकअपसह ३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
– चालकाचा जंगलात पळ
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : तालुक्यातील मालेवाडा मदत केंद्राच्या हद्दीत अवैध गोवंश तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी धडक कारवाई करत बोलेरो पिकअपसह तब्बल ३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, वाहनचालक पोलिसांची चाहूल लागताच जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कातलवाडा येथून धनेगावकडे एका बोलेरो पिकअप (क्रमांक MP-04-ZQ-6809) मधून अवैधरित्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मालेवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धनेगाव परिसरात सापळा रचून संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच चालकाने वाहन सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले.
यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये अमानुषपणे कोंबून ठेवलेले जनावरे आढळून आली. यात एक लाल रंगाची गाय, एक पांढरी गाय, एक धामण रंगाची गाय, एक धामण रंगाचे वासरू, दोन पांढरी वासरे तसेच दोन पांढरे बैल (कानात पिवळ्या बिल्ल्यांसह) यांचा समावेश आहे. या जनावरांची अंदाजे किंमत ६६ हजार रुपये असून, जप्त करण्यात आलेल्या बोलेरो पिकअपची किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुराडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा मालेवाडा मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आकाश बी. नाईकवाडी व त्यांच्या पथकाने पार पाडली. फरार आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














