चार दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांचा संप कायम ; वेतन रखडल्याने कुरखेड्यात कचऱ्याचे ढिग

9

चार दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांचा संप कायम ; वेतन रखडल्याने कुरखेड्यात कचऱ्याचे ढिग
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २८ : कुरखेडा नगर पंचायत अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही कायम राहिल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्था कोलमडली आहे. वार्डांमध्ये कचरा संकलन बंद पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन अद्याप थकीत असल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. यापूर्वी एका महिन्याचे वेतन देण्यात आले असले, तरी उर्वरित रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेळेवर वेतन न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, घनकचरा संकलनाचे टेंडर महिला बचत गटाला देण्यात आले असताना रक्कम खात्यात जमा न करता नगदी स्वरूपात देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नगर पंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निविदा प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी असल्याने निधी वळती करण्यात आलेला नाही. मात्र, प्रक्रिया नियमानुसार असेल तर कर्मचाऱ्यांचे वेतन का रखडले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आंदोलनामुळे घंटागाड्या वार्डांमध्ये फिरत नसल्याने घरगुती कचरा रस्त्यांवर साचू लागला आहे. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात इतर कंत्राटी कामगारांकडून कचरा संकलन सुरू केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत वेतन अदा करावे, निविदेतील घोळ स्पष्ट करावा आणि संप मागे घेण्यासाठी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी नागरिक व कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here