२१० कोटींच्या आष्टी पुलाला उद्घाटनाआधीच भगदाड ; निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा…
– महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : चंद्रपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी येथील वैनगंगा नदीवर तब्बल २१० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाला वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पुलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
ब्राह्मणवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी रस्ते आणि पूल उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात कामांच्या गुणवत्तेशी तडजोड होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आष्टी पुलावरील भगदाड ही बाब त्याचेच जिवंत उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.
काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या या पुलाचे अद्याप अधिकृत उद्घाटनही झाले नसताना पुलावर मोठा व खोल खड्डा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलाची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही राष्ट्रीय महामार्गासह इतर विकासकामांच्या दर्जाबाबत निष्काळजीपणा दिसून येत असल्याची टीकाही ब्राह्मणवाडे यांनी केली. संबंधित कंत्राटदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच पुलाच्या संपूर्ण कामाचे तांत्रिक ऑडिट करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #AshtiBridgeScam #GadchiroliNews #BridgeCollapse #PoorQualityWork #InfrastructureFailure #210CroreBridge #MahendraBrahmanwade #DemandForInquiry #CorruptionExposed #PublicSafety #MaharashtraNews #NationalHighway #ConstructionScam #AccountabilityNow #BreakingNews














