कोरची : लग्नसमारंभात वाद, वृद्धावर दगडाने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. २८ : तालुक्यातील झेंडेपार गावात लग्नसमारंभादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर हल्ल्यात झाले. दारूच्या नशेत असलेल्या युवकाने वृद्ध व्यक्तीवर दगडाने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी झेंडेपार येथील राजेंद्र होळी यांच्या घरी लग्नसमारंभ होता. आदिवासी परंपरेनुसार ‘रेला डान्स’ सुरू असताना आरोपी पंकज विनोद ताडामी (वय 28, रा. सोहले) हा मद्यधुंद अवस्थेत एका मुलीकडे अयोग्य वर्तन करत होता. यावेळी हिरालाल मणकेर मडावी (वय 55) यांनी त्याला समज दिली.
याचा राग मनात धरून आरोपीने पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन हिरालाल मडावी यांच्यावर मोठ्या दगडाने हल्ला केला. “तुला जिवंत सोडत नाही,” अशी धमकी देत डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर कुटुंबीय जखमींच्या उपचारात व्यस्त असल्याने 27 एप्रिल रोजी कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 109(1) व 333 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














