परवानगीशिवाय रेतीघाटाचा लिलाव? रेतीवाहतुकीने रस्त्याची चाळण, बेशरमची झाडे लावून नगरी ग्रामस्थांचा निषेध

161

परवानगीशिवाय रेतीघाटाचा लिलाव? रेतीवाहतुकीने रस्त्याची चाळण, बेशरमची झाडे लावून नगरी ग्रामस्थांचा निषेध
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : रेतीघाटासाठी ग्रामपंचायतीची परवानगी नसतानाही लिलाव कसा करण्यात आला, असा सवाल उपस्थित करत नगरी येथील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेती वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या नगरी गावातील नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिक आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. रस्त्यालगत शेकडो एकर शेती असून, उभ्या पिकांना खत देणे, फवारणी करणे तसेच शेतीची इतर कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

‘परवानगी नसताना लिलाव कसा?’

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नगरी ग्रामपंचायतीने संबंधित रेतीघाटासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. असे असताना महसूल प्रशासनाने घाटाचा लिलाव कोणत्या आधारावर केला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे रेतीघाटाच्या लिलावाची प्रक्रिया आणि त्यामागील प्रशासकीय परवानग्यांबाबत स्पष्टता देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामसभेत ठराव; जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

या प्रश्नाची गंभीर दखल घेत १७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत नदीघाटाकडे जाणारा खड्डेमय रस्ता तातडीने काँक्रीटचा करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हा वार्षिक जनसुविधा योजना किंवा उपलब्ध अन्य निधीतून रस्त्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरपंच भूमिला बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोरेश्वर बांबोळे, पोलीस पाटील नागेश्वरी तिवारी यांच्यासह चंदन वाघरे, अमन बांबोळे, सौरभ चरडूके, कल्पना मेश्राम, मनोहर कुंभारे, मृणाल कुंभारे, रणजित म्हशाखेत्री, लता भोयर, प्रियंका थोरात, वर्षा कोसमशील, आशा राऊत, सोनिया उईके, कविता उईके, ललिता मडावी, मनीषा उईके, मनिरो ओमत, गंगा छेत्री, मिलिंद म्हशाखेत्री यांच्यासह शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आता रेतीघाटाच्या लिलावाची प्रक्रिया नेमकी कोणत्या परवानग्यांच्या आधारे झाली आणि रेतीवाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार, याबाबत महसूल प्रशासन काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here