Gadchiroli : वनविभागातील नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा डाव, बनावट नियुक्ती आदेशांपासून सावध राहा

6

Gadchiroli : वनविभागातील नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा डाव, बनावट नियुक्ती आदेशांपासून सावध राहा
– मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांचे उमेदवारांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : वनविभागात वनरक्षक, वनपाल तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. बनावट नियुक्ती आदेश देऊन उमेदवारांकडून पैशांची मागणी केली जात असल्याने उमेदवारांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी केले आहे.
फसवणूक करणाऱ्यांकडून उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयाचे बनावट लेटरहेड तयार करण्यात येत असून त्यावर महाराष्ट्र शासनाच्या लोगोचाही गैरवापर केला जात असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासकीय स्वरूपाचा दिसणारा कोणताही नियुक्ती आदेश मिळाल्यास त्याची अधिकृत माध्यमातून खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी या पदांची भरती व नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसार केली जाते. पैसे किंवा वैयक्तिक संपर्काच्या आधारे नियुक्ती करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे नरवणे यांनी स्पष्ट केले.
नियुक्तीच्या मोबदल्यात पैशांची मागणी झाल्यास, बनावट नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यास अथवा वनविभागाच्या नावाने संशयास्पद कागदपत्रे सादर करण्यात आल्यास संबंधितांनी तातडीने मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पोटेगाव रोड, गडचिरोली येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.
भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती केवळ शासन आणि वनविभागाच्या अधिकृत माध्यमांतूनच तपासावी. नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून पैसे गमावू नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #forest #recrutment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here