कुरखेडाचे सहाय्यक गटविकास अधिकारी उराडे सक्तीच्या रजेवर; विभागीय चौकशीचे आदेश

3

कुरखेडाचे सहाय्यक गटविकास अधिकारी उराडे सक्तीच्या रजेवर; विभागीय चौकशीचे आदेश
– २६ दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर शासनाची कारवाई
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २९ : कुरखेडा पंचायत समितीतील सहाय्यक गटविकास अधिकारी डी. बी. उराडे यांच्याविरोधात अखेर शासनस्तरावर कारवाई करण्यात आली आहे. उराडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात सरपंच संघटनेच्या वतीने मागील २६ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणानंतर त्यांच्या कार्यकाळातील प्रकरणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत अथवा शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत उराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून यासंदर्भातील आदेश सरपंच संघटनेला देण्यात आला. विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या स्तरावरून उराडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे. शासनाच्या या निर्णयानंतर सरपंच संघटनेने आपले उपोषण तूर्तास स्थगित केले.
उराडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत यापूर्वी जिल्हा ग्रामविकास अधिकारी संघटनेनेही भूमिका घेतली होती. त्यानंतर सावलखेडा ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन सरपंच यांच्याविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने वाद अधिक वाढला. ही कारवाई करताना अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन नियमबाह्य कार्यवाही करण्यात आल्याचा आरोप सरपंच संघटनेने केला होता.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचे प्रशासक, माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलनाला आमदार, माजी आमदार तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
शासनाकडून विभागीय चौकशीचे आदेश आणि सक्तीच्या रजेची कारवाई झाल्यानंतर आंदोलकांनी उपोषण स्थगित केले. आमदार रामदास मसराम आणि माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आंदोलकांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, काँग्रेस तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी सभापती गिरीधर तितराम, नगरसेवक सागर निरंकारी, भाजयुमो तालुकाध्यक्ष उल्हास देशमुख, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, माजी नगरसेवक उस्मान खान, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रांजल धाबेकर यांच्यासह सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, विभागीय चौकशीत उराडे यांच्यावरील आरोपांबाबत काय निष्पन्न होते, याकडे आता कुरखेडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here