पात्र मतदारांचे नाव वगळले जाणार नाही! गडचिरोलीत मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; ८४ हजार प्रकरणांत सुनावणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : रोजगारासाठी किंवा अन्य कारणांनी काही काळ गावाबाहेर गेलेल्या नागरिकाचे नाव केवळ तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे मतदार यादीतून वगळू नये. अशा प्रत्येक प्रकरणाची काळजीपूर्वक पडताळणी करून संबंधित नागरिकाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे स्पष्ट निर्देश नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा बिदरी यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील पुनरीक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मतदार यादी अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पडताळणीदरम्यान पत्ता न लागलेल्या किंवा अनुपस्थित आढळलेल्या मतदारांची माहिती ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद आणि तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर नागरिकांना सहज दिसेल अशा पद्धतीने प्रसिद्ध करावी. नागरिकांनीही मतदार यादीत आपले नाव तपासावे. पात्र असूनही नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ द्वारे नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन बिदरी यांनी केले.
७ लाख ३८ हजारांहून अधिक अर्जांचे डिजिटायझेशन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कामाची माहिती दिली. १८ जून २०२६ पर्यंत जिल्ह्यात ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची नोंदणी झाली होती. वितरित गणना अर्जांपैकी ७ लाख ३८ हजार २८८ अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, ९० हजार ६१६ अर्ज संकलित होऊ शकलेले नाहीत.
संकलित न झालेल्या अर्जांमध्ये ३५ हजार ८८६ मृत मतदार, ७ हजार ५२९ पत्ता न लागलेले अथवा पडताळणीवेळी अनुपस्थित, ३६ हजार ८३७ कायमस्वरूपी स्थलांतरित, ९८२ इतर प्रकरणे आणि ९ हजार ३८२ आधीच नोंदणीकृत मतदारांचा समावेश आहे. ही यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
डिजिटायझेशन झालेल्या अर्जांपैकी २७ हजार ४१४ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, तर ५६ हजार ८५२ नोंदींमध्ये विसंगती आढळली आहे. त्यामुळे एकूण ८४ हजार २६६ प्रकरणांमध्ये सुनावणी अपेक्षित आहे. जिल्ह्यात ११० सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यरत असून, प्रत्येक अधिकारी दररोज सरासरी २५ सुनावण्या घेत आहे.
हंगामी स्थलांतरित मतदारांच्या अडचणी मांडल्या
आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दुर्गम भागातील मतदारांच्या अडचणी बैठकीत मांडल्या. रोजगार आणि मिरची तोडणीसाठी अनेक नागरिक हंगामी स्वरूपात तेलंगणा किंवा अन्य भागांत स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांना पडताळणीची माहिती मिळावी तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावर तात्पुरत्या अनुपस्थितीची प्रकरणे काळजीपूर्वक तपासून नियमानुसार निर्णय घ्यावा, असे निर्देश बिदरी यांनी दिले.
नवमतदारांच्या नोंदणीवरही भर
१८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावेत, तसेच महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मतदार नोंदणीची माहिती पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून ३ हजार ८९३ बूथ लेव्हल एजंट्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादीतील नोंदी अचूक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.













