कन्हाळगावच्या शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्तावाढीवर मार्गदर्शन
– रांगी केंद्रातील इयत्ता १ ली ते ८ वीच्या शिक्षकांचा सहभाग; निपुण महाराष्ट्र
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ३० : पंचायत समिती धानोरा अंतर्गत समूह साधन केंद्र रांगीच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील तिसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कन्हाळगाव येथे उत्साहात पार पडली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), गडचिरोली यांच्या सूचनेनुसार आयोजित या परिषदेत रांगी केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला.
रांगी केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीचे मुख्याध्यापक व सहशिक्षक परिषदेला उपस्थित होते. सकाळी ११.३० वाजता DIETच्या लिंकद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन पूर्वचाचणीने परिषदेची सुरुवात झाली.
यानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी ‘आनापान साधना’ घेण्यात आली. शाळेच्या प्रांगणातील मैदानावर शांत व प्रसन्न वातावरणात झालेल्या या साधनेत शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
परिषदेतील विविध सत्रांमध्ये शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञ शिक्षक व प्रमुखांनी मार्गदर्शन केले. पंचायत समिती धानोरा येथील साधन व्यक्ती मधुकर सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘निपुण महाराष्ट्र’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर अमरदीप भुरले यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख संदीप जुआरे यांनी PGI व UDISE+ पोर्टलवरील अद्ययावत माहिती, शैक्षणिक क्षेत्रभेटीचे नियोजन तसेच त्रैमासिक पालकसभा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
रामगुलाल गव्हर्ना यांनी ‘आदर्श पाठ’ सादर केला. विनोद जुमनाके यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांचे सादरीकरण केले. स्मिता साळवे यांनी नवीन SOPनुसार शाळा व्यवस्थापन समिती (SMC) पुनर्गठनाबाबत माहिती दिली. तर प्रगती धाईत यांनी शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर कसा करावा, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता सुधारणा, शिक्षकांचा व्यावसायिक विकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात उपयुक्त चर्चा झाली. शेवटी केंद्रप्रमुख संदीप जुआरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रीय गीताने शिक्षण परिषदेची सांगता झाली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews
kanhalgaon-shikshan-parishad-rangi-gadchiroli
कन्हाळगाव, धानोरा, गडचिरोली, शिक्षण परिषद, रांगी केंद्र, शैक्षणिक गुणवत्तावाढ, निपुण महाराष्ट्र, UDISE+, PGI, SMC, DIET गडचिरोली, शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण विभाग













