आश्रमशाळांतील वास्तव दाखविण्यावर निर्बंध? जपतलाई दुर्घटनेनंतर अहेरी प्रकल्प कार्यालयाचे नवे फरमान
– पत्रकार, सामाजिक संघटना आणि त्रयस्थ व्यक्तींच्या प्रवेशासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी सक्तीची, फोटो-व्हिडिओवरही निर्बंध
The गडविश्व
गडचिरोली | चेतन गहाणे, दि. १५ : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील शासकीय आश्रमशाळेत सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील सुरक्षा व सोयी-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी कार्यालयाने आश्रमशाळा व आदिवासी वसतीगृहांमध्ये पत्रकार, संघटना आणि त्रयस्थ व्यक्तींच्या प्रवेशाबाबत नवे निर्देश जारी केले आहेत.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) धनराज पी. डबले यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय विविध संघटना, त्रयस्थ व्यक्ती, दूरचित्रवाहिनी प्रतिनिधी किंवा पत्रकारांना आश्रमशाळा व वसतीगृहात प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संपर्क साधू देऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
फोटो-व्हिडिओसाठीही पूर्वपरवानगी
आश्रमशाळा व वसतीगृहातील कोणतेही छायाचित्र, व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा अन्य दृश्य सामग्री कोणत्याही व्यक्ती, संस्था, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था किंवा सोशल मीडिया माध्यमांसाठी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या पूर्वलिखित परवानगीशिवाय उपलब्ध करून देऊ नये किंवा प्रसारित करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
छायाचित्रण अथवा व्हिडिओ चित्रीकरणासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडे प्रकल्प अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी असल्याची खात्री करूनच आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश मुख्याध्यापक व गृहपालांना देण्यात आले आहेत.
प्रवेशद्वारावर डिजिटल सूचना फलक
सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहांच्या दर्शनी भागात किंवा प्रवेशद्वाराजवळ डिजिटल सूचना फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्वपरवानगीशिवाय छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग, प्रसारण अथवा दृश्य सामग्री उपलब्ध करून देणे प्रतिबंधित असल्याची सूचना या फलकावर प्रदर्शित करावी, तसेच त्याचा अनुपालन अहवाल प्रकल्प कार्यालयास सादर करण्याचे निर्देश आहेत.
याशिवाय शाळा व वसतीगृहांच्या प्रवेशद्वारावर व्हिजिटर बुक अद्ययावत ठेवून प्रत्येक त्रयस्थ व्यक्तीच्या आगमनाची व जाण्याची नोंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
पालकांनाही फोटो-व्हिडिओवर निर्बंध
विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक किंवा माजी विद्यार्थ्यांना नियोजित भेटीच्या वेळेत विद्यार्थ्यांना भेटण्याची मुभा असली तरी मोबाईल किंवा कॅमेऱ्याद्वारे विद्यार्थ्यांचे फोटो अथवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नसल्याचे पत्रात नमूद आहे.
विद्यार्थ्यांचे फोटो व माहिती ऑनलाइन लीक होऊ नये, यासाठी आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये दरमहा सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे या विषयावर प्रबोधन सत्र आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
उल्लंघन झाल्यास मुख्याध्यापक, गृहपाल जबाबदार
या सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा गृहपाल यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून प्रचलित शासकीय नियमांनुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच शिक्षक, अधीक्षक-अधीक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देऊन दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘सुरक्षे’च्या नावाखाली पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह?
जपतलाई आश्रमशाळेतील दुर्घटनेनंतर आश्रमशाळांमधील सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवास व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार आश्रमशाळांची पाहणी करून तेथील परिस्थिती समोर आणत असताना, त्यांच्याच प्रवेशावर पूर्वपरवानगीची सक्ती करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विद्यार्थ्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी हे निर्देश देण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी आश्रमशाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती समोर आणण्यासाठी पाहणी आणि वृत्तांकनालाच मर्यादा येणार नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
ज्या घटनेनंतर आश्रमशाळांमधील सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची चर्चा सुरू झाली, त्याच वेळी बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध आणल्याने या आदेशाची चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे. त्यामुळे हा आदेश विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आहे की आश्रमशाळांतील वास्तवावर पडदा टाकणारा ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #GadchiroliNews #Japtalai #AshramSchool #TribalDevelopment #TribalStudents #MaharashtraNews #Maharashtra #Aheri #Dhanora #EducationNews #StudentSafety #SchoolSafety #PressFreedom #MediaFreedom #Journalism #SocialJustice #TribalWelfare #BreakingNews #TheGadVishwa













