‘चरखे के पास चर्चा’चा मानवी साखळीने समारोप; ५ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
– सुपीक शेतजमिनी वाचविण्यासाठी आता लढाई गावागावात – महेंद्र ब्राह्मणवाडे
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : सुपीक शेतजमिनींचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हक्क आणि जिल्ह्यातील विविध मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद अभियानाचा स्वातंत्र्यदिनी भव्य मानवी साखळीने समारोप झाला. गडचिरोली शहरात झालेल्या या मानवी साखळीत ५ हजारांहून अधिक शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.
९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान आयोजित या अभियानातून स्वातंत्र्याच्या वारशाचे स्मरण, विविध प्रश्नांवर विचारमंथन आणि जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाची दिशा यावर लोकसंवाद घडवून आणण्यात आला. समारोपाच्या वेळी सुपीक शेतजमिनींचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हक्क, रोजगार, आरोग्य, शिक्षण, वाहतूक यांसह जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी एकजुटीने आवाज उठविला.
यावेळी संयोजक महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले, “‘चरखे के पास चर्चा’चा समारोप झाला असला तरी शेतकऱ्यांच्या हक्कांची लढाई संपलेली नाही. जिल्ह्यातील सुपीक शेतजमीन आणि शेतकरी वाचविण्यासाठी आता पुढची लढाई गावागावात लढली जाणार आहे. या लढ्यात महिला भगिनींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी पुढाकार घ्यावा.”
समाजात फूट पाडून मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मात्र, अशा प्रयत्नांना बळी न पडता शेतकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी एकजूट कायम ठेवून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा, असे आवाहनही ब्राह्मणवाडे यांनी केले.
विविध मान्यवरांचा सहभाग
जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीत झालेल्या ‘चरखे के पास चर्चा’मध्ये विविध राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत जिल्ह्यातील प्रश्नांवर भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या हक्कांच्या लढ्याला पाठिंबा देत असल्याचे अनेक मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केले.
समारोप कार्यक्रमास महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ. अनंता कुंभारे, दिवाकर निसार, कुसुमताई आलाम, अनिल कोठारे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, नगरसेविका मनीषा खेवले, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, नेताजी गावतुरे, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, अब्दुल पंजवाणी, सुनील चडगुलवार, उत्तम ठाकरे, विजय लाड, सुभाष कोठारे, रोडे महाराज, तात्याजी चिचघरे, विजय शेंडे, जावेद खान, निकेश कामीडवार, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, श्रीनिवास ताडपल्लीवार, डॉ. शीतल ठवरे, रीताताई गोवर्धन, मीनल चिमूरकर, उईके ताई, ढीवरू मेश्राम, देवानंद कुमरे, विकास जेंगठे यांच्यासह ५ हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते.
गावागावात लोकसंवादाचा निर्धार
‘चरखे के पास चर्चा’च्या माध्यमातून जनतेने मांडलेल्या प्रश्नांचा पुढील काळातही पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शेतकरी व नागरिकांच्या हक्कांसाठी गावागावात लोकसंवाद आणि जनआंदोलन उभारण्याची भूमिकाही यावेळी जाहीर करण्यात आली.













