‘व्हिजन २०४७’मधून विकसित गडचिरोलीची दिशा ठरविण्याची गरज

4

 

‘व्हिजन २०४७’मधून विकसित गडचिरोलीची दिशा ठरविण्याची गरज
– माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपक्रमाला सर्वपक्षीय सहभागाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि.१५ : ‘विकसित गडचिरोली, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुढाकार घेतलेली ‘व्हिजन २०४७ – गडचिरोली जिल्हा’ ही संकल्पना जिल्ह्याच्या दीर्घकालीन आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमाला पक्षीय चौकटीबाहेर नेऊन सर्वपक्षीय व सर्वसमावेशक स्वरूप देण्याची गरज पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.
गडचिरोलीच्या विकासासाठी शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती, आरोग्य, पर्यटन आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. जिल्ह्याची वन, जल व खनिज संपत्ती, जैवविविधता तसेच समृद्ध आदिवासी संस्कृती यांचा शाश्वत पद्धतीने स्थानिक विकासासाठी उपयोग करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, इंटरनेट आणि रोजगाराच्या समस्या दूर करण्यासोबतच युवकांच्या कौशल्यविकासाला चालना देणे आवश्यक आहे. कृषी व वनाधारित उद्योग, बांबू प्रक्रिया, पर्यटन तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

सर्वसमावेशक व्यासपीठाची अपेक्षा

‘व्हिजन २०४७’ हे केवळ कोणत्याही एका पक्षाचे व्यासपीठ न राहता गडचिरोलीच्या भविष्यासाठी सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक विकासाचे व्यासपीठ बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सामाजिक संस्था, तज्ज्ञ, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, युवक तसेच विकासाची सकारात्मक दृष्टी असलेल्या नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या सूचना व संकल्पना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्याची बलस्थाने आणि कमकुवत बाजू ओळखून स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे, तसेच उपलब्ध नैसर्गिक व मानवी क्षमतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. सामूहिक प्रयत्नांतून २०४७ पर्यंत गडचिरोलीला विकसित, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक जिल्हा बनविण्याची दिशा निश्चित करता येईल, असा सूर पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला प्रमोद पिपरे, ॲड. कविता मोहरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here