वानरचुवा जंगलात अवैध हातभट्टीवर धाड ; ३.४४ लाखांचा मुद्देमाल नष्ट
– धानोरा पोलिसांची दारूविरोधात कारवाई; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १७ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या मोहफुलाची दारू तयार करून विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात धानोरा पोलिसांनी कठोर कारवाई केली. वानरचुवा जंगल परिसरात १६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांत हातभट्टी उद्ध्वस्त करून तब्बल ३ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वानरचुवा येथील प्रमोद अंताराम हलामी (४२) हा घरामागील जंगल परिसरात मोहफुलाच्या सडव्यापासून अवैध हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी जंगलाचा फायदा घेत पसार झाला.
पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता २०० लिटर क्षमतेच्या १५ प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ३ हजार किलो मोहफुलाचा सडवा, अंदाजे ३ लाख रुपये किमतीचा, तसेच २० लिटर तयार मोहफुलाची दारू, ४ हजार रुपये किमतीची, असा एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हातभट्टीचे साहित्य, तयार दारू आणि मोहफुलाचा सडवा नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी धानोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (क), ६५ (ड), ६५ (ई) व ६५ (फ) अंतर्गत फरार आरोपी प्रमोद हलामीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत शिवराम अन्नाजी बोगा (४५), रा. वानरचुवा हा घराशेजारील झोपडीत मोहफुलाची दारू विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली असता २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे २०० लिटर मोहफुलाची दारू, अंदाजे ४० हजार रुपये किमतीची, आढळून आली. सदर दारूही नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.
याप्रकरणी धानोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत शिवराम बोगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही प्रकरणांत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक अजय कोरडे तसेच पोलीस कर्मचारी जन्हेरसिंग उसेंडी, सुशील मेश्राम, प्रशांत ताडोसे, राहुल बनकर, विक्रांत मोहुर्ले आणि प्रियंका कावळे यांनी केली.













