कोटगुल परिसरात अवैध जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त ; १.५० कोटींचा मुद्देमाल जप्त
– ३४ जुगारी ताब्यात, २ मुख्य सूत्रधारांसह ३६ जणांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : कोटगुल परिसरातील नांगपूर जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी पहाटे धडक कारवाई केली. या कारवाईत ३४ जुगाऱ्यांना ताब्यात घेत ४ लाख ४१ हजार ५०० रुपये रोख रकमेसह २३ चारचाकी, ५ दुचाकी वाहने व जुगाराचे साहित्य असा एकूण १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जुगार भरविणाऱ्या दोन मुख्य सूत्रधारांसह एकूण ३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास नांगपूर येथील जंगल परिसरात काही इसमांकडून पैशांची बाजी लावून जुगार खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सपोनि. भगतसिंग दुल्हत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोटगुल पोलिसांच्या मदतीने पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
पोलिसांनी छापा टाकला असता काही इसम ५२ ताशांच्या पत्त्यांच्या सहाय्याने पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस पथकाने कारवाई करत घटनास्थळावरून एकूण ३४ जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये बिरेंद्र कुमार एवनलाल सिन्हा (वय २६, रा. कोटरासरार, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) आणि प्रकाश कुमार शामलाल मेश्राम (वय ५०, रा. बजरंग मार्ग, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) यांचा समावेश आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता, परमेश्वर लोहंबरे (रा. नांगपूर) आणि मिथुन तांबेकर (रा. कोटगुल) यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ लाख ४१ हजार ५०० रुपये रोख, २३ चारचाकी, ५ दुचाकी वाहने, ताशांचे पत्ते, स्टीलची पेटी, लाल रंगाची बॅटरी आणि ताडपत्री असा एकूण १ कोटी ५० लाख ९७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कोटगुल पोलिस ठाण्यात अप. क्र. ००८/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. विवेक वायकर करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी, कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुल्हत यांच्यासह पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच कोटगुल पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
#thegdv #thegadvishva #Gadchiroli #Kotgul #IllegalGambling #GamblingRaid #PoliceAction #CrimeBranch #GadchiroliPolice #MaharashtraPolice #CrimeNews #PoliceRaid #IllegalActivities #SeizedProperty #BreakingNews #MaharashtraNews #GadchiroliNews













