करपडा चक येथे वाळू उत्खननासाठी बनावट कागदपत्रांचा खेळ ; दोषींवर कारवाईची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : आरमोरी तालुक्यातील करपडा चक येथील सर्व्हे क्रमांक १५७ मधील वाळू उत्खनन प्रकरणात बनावट कागदपत्रे, खोटे अहवाल आणि नियमबाह्य पोटहिस्सा मोजणीचा गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात भूमी अभिलेख विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि वाळू माफिया यांच्या संगनमतातून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची सूरज अ. हजारे, शंकर का. ढोलगे आणि रवींद्र सेलोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, करपडा चक येथील सर्व्हे क्र. १५७ मधील खातेधारक राजाराम पांडुरंग गेडाम उर्फ राजमशहा पांडुरंग गेडाम यांचे निधन १९ एप्रिल २०१७ रोजी झालेले असतानाही १९ मे २०२५ रोजी झालेल्या पोटहिस्सा मोजणीवेळी त्यांना उपस्थित दाखविण्यात आले. त्यानंतर सदर सर्व्हे क्रमांकाचे दोन हिस्से करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार वाळू उत्खननासाठी परवानगी मिळवून देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
तसेच पेसा क्षेत्रातील नियमांनुसार वाळू निष्कासनासाठी ग्रामसभेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असताना काही वाळू माफियांनी बाहेरून बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून त्यावर सरपंचांची सही घेऊन ते सादर केल्याचा आरोप करण्यात आला. माहिती अधिकारातून ग्रामपंचायतीकडे असा कोणताही दस्तावेज उपलब्ध नसल्याचे तसेच संबंधित ग्रामसभा झालेली नसल्याचे उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय विविध विभागांच्या अहवालांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी पावसाळ्यात केलेल्या मोजमापात त्या क्षेत्रात वाळू असल्याचा उल्लेख केला असला, तरी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समितीने केलेल्या पाहणीत त्याच क्षेत्रात भुईमूग पिकाची लागवड असल्याचे नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला. भूजल सर्वेक्षण विभागाने पाण्याची खोली ३ ते ३.६० मीटर असल्याचा अहवाल दिला असला, तरी तो चुकीचा असून सादर केलेली छायाचित्रे दुसऱ्या क्षेत्रातील असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कृषी व पाटबंधारे विभागानेही त्या क्षेत्रात पीक घेता येत नसल्याचा चुकीचा अहवाल दिल्याचे सांगण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट कागदपत्रे तयार करणे, चुकीचे अहवाल सादर करणे आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी-कर्मचारी व इतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #KarapdaChak #SandMining #FakeDocuments #IllegalSandMining #Gadchiroli #Armori #PressConference #CorruptionAllegation #RevenueDepartment #LandRecords #MaharashtraNews #SandMafia #InvestigationDemand #LocalNews #BreakingNews













