एटापल्लीत महावितरणविरोधात जनआक्रोश ; अवास्तव वीजबिलांविरोधात शेकडो नागरिकांचा मोर्चा

15

एटापल्लीत महावितरणविरोधात जनआक्रोश ; अवास्तव वीजबिलांविरोधात शेकडो नागरिकांचा मोर्चा
The गडविश्व
एटापल्ली, दि. ८ : अवास्तव व चुकीची वीजबिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, स्मार्ट मीटरची सक्ती आणि महावितरणच्या कथित ढिसाळ कारभाराविरोधात एटापल्ली शहरात गुरुवारी नागरिकांचा संताप उफाळून आला. नगर पंचायत एटापल्लीच्या पुढाकाराने नगराध्यक्ष रेखा गजानन मोहुर्ले यांच्या नेतृत्वाखाली तसेच नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार यांच्या पुढाकाराने शेकडो नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत जनआक्रोश मोर्चा काढला.

संविधान चौकातून निघालेला मोर्चा घोषणाबाजी करत महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. यामध्ये नगर पंचायत पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी उपअभियंत्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अवास्तव वीजबिले रद्द करा

चुकीची व अवास्तव वीजबिले तातडीने रद्द करावीत, प्रत्येक ग्राहकाचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊनच बिल आकारावे, अंदाजे बिल देण्याची पद्धत बंद करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यासोबतच २४ तास दर्जेदार वीजपुरवठा, जीर्ण वीजवाहिन्या व ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती, स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, विशेष तक्रार निवारण शिबिर घेणे तसेच अतिरिक्त लाईनमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.

एटापल्लीचे ग्रामीण वर्गीकरण रद्द करण्याची मागणी

महावितरणच्या नोंदीतील एटापल्ली शहराचे ग्रामीण वर्गीकरण रद्द करून शहरी वर्गीकरण लागू करावे, अशी मागणीही करण्यात आली. आदिवासी विकास उपयोजनेअंतर्गत प्रस्तावित पाच ट्रान्सफॉर्मरना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

१३२ के.व्ही. वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करा

सूरजागड औद्योगिक प्रकल्पासाठी असलेल्या १३२ के.व्ही. वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास त्याचा थेट परिणाम एटापल्ली शहराच्या वीजपुरवठ्यावर होऊन संपूर्ण शहर अंधारात जाते, असा मुद्दा मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केला. शहरासाठी स्वतंत्र अथवा पर्यायी १३२ के.व्ही. वीजपुरवठा व्यवस्था उभारण्याची ठाम मागणी करण्यात आली.

महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नागरिकांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

मोर्चात नगराध्यक्ष रेखा मोहुर्ले, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, राहुल कुळमेथे, निर्मला नल्लावार, बंटी मोहुर्ले, प्रसाद पुल्लूरवार, सुरेखा मूलकावार, पूजा पुल्लूरवार, प्रसाद राजकोंडावार, अनिकेत मामीडवार, ओमकार मोहुर्ले, गणेश खेडेकर, विजय सुंकेपाकवार, नरेश रामटेके, छाया मामीडवार, मनिषा राजकोंडावार, रोहिदास भुरसे, पुंडलिक मानापुरे, दीपक फुलसंगे, सुनीता चांदेकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या मोर्चामुळे एटापल्लीतील वीजपुरवठा आणि बिलांच्या प्रश्नाने पुन्हा एकदा जोर धरला असून, नागरिकांच्या मागण्यांवर महावितरण प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here