शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले ; गेवरा बुजचे सरपंच पायउतार
– जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, माजी उपसरपंचाच्या तक्रारीनंतर वर्षभर सुनावणी
The गडविश्व
सावली, दि. ८ : शासकीय जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सावली तालुक्यातील गेवरा बुज ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन चन्नावार यांना सरपंचपदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयामुळे चन्नावार यांना सरपंचपद गमवावे लागले आहे.
गेवरा बुज गावातील मुख्य चौकातील सार्वजनिक जागेवर सरपंच मोहन चन्नावार यांनी पदाचा गैरवापर करून घराचे बांधकाम केल्याची तक्रार ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तिलक वाढणकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीत अतिक्रमण केल्याचे तथ्य आढळून आल्याने प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले.
या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुमारे वर्षभर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान तक्रारदाराने अतिक्रमणासंदर्भातील विविध पुरावे सादर केले. गैरअर्जदारालाही आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली. मात्र, त्यांना आपली बाजू प्रभावीपणे सिद्ध करता आली नाही.
अखेर उपलब्ध पुरावे आणि सुनावणीतील बाबींच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी मोहन चन्नावार यांना सरपंचपदावरून अपात्र घोषित केले. त्यामुळे शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा ठपका सिद्ध झाल्यानंतर गेवरा बुजच्या सरपंचांना पद गमवावे लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chandrpurnews #sawalinews #breakingnews













