KYC अभावी ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून वंचित; प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी

10

KYC अभावी ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून वंचित; प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी
– भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ८ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक पात्र महिला शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांची KYC प्रक्रिया तातडीने सुरू करून त्यांना योजनेचा नियमित लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली.
यासंदर्भात फाये यांनी मुंबई येथील मंत्रालयात मंत्री अदिती तटकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. KYC प्रक्रिया बंद असल्याने अनेक लाभार्थी महिलांना संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होत असून, शारीरिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे फाये यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना आर्थिक दिलासा मिळत आहे. मात्र, KYC प्रक्रियेअभावी पात्र असूनही काही महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
पात्र लाभार्थी महिलांच्या KYC संदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून प्रक्रिया सुरू करावी आणि कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी फाये यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यासह कुरखेडा तालुक्यातील पात्र महिलांना योजनेचा लाभ नियमित व सुरळीतपणे मिळावा, यासाठी शासनाने KYC प्रक्रिया तातडीने सुरू करण्याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही चांगदेव फाये यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here