गडचिरोलीतील जनसमस्यांवर ‘चरके के पास चर्चा’; उद्या राजीव गांधी भवनात लोकसंवाद
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘चरके के पास चर्चा’ या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
गडचिरोली जिल्हा सध्या विविध मूलभूत आणि गंभीर समस्यांना सामोरा जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व मते जाणून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हा या लोकसंवाद कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यावेळी सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण, एमआयडीसी, विमानतळ व इतर प्रकल्पांबाबत नागरिकांचे मत, बेरोजगारी व रोजगारनिर्मिती, शासकीय कार्यालयांतील रिक्त पदे तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवेची दयनीय अवस्था यावर चर्चा होणार आहे.
तसेच रानटी हत्तींचा वाढता उपद्रव, वनपट्टे, रखडलेले सिंचन प्रकल्प, अपुऱ्या आरोग्य सुविधा, खराब रस्ते व दळणवळणाच्या समस्या, पिण्याचे पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नही चर्चेत घेतले जाणार आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, तसेच जिल्ह्यात वाढत असलेल्या अपघातांवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज यावरही नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले जाणार आहे.
या लोकसंवादाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना, मते आणि समस्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













