मुनघाटे महाविद्यालयात अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळावा
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०९ : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि लायर्ड मेटल यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात अग्निवीर भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सोमवार, १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
भारतीय सैन्याच्या सेना भरती कार्यालय, नागपूर येथील लेफ्टनंट कर्नल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात अग्निवीर भरतीसंदर्भातील भरतीचे निकष, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन, सेवाशर्ती तसेच सेवेनंतर उपलब्ध होणाऱ्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
परिसरातील अग्निवीर होऊ इच्छिणाऱ्या आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आयुक्त रा. ना. माटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे आणि रोजगार मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी केले आहे.













