शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरूमगाव येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात

110

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरूमगाव येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०२ : शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुरूमगाव (ता. धानोरा, जि. गडचिरोली) येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव व पालक मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पुनीताताई दर्रो होत्या. उद्घाटक म्हणून मुरूमगावचे सरपंच शिवप्रसाद गवर्ना उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पन्नेमाराच्या सरपंच शेवंतीताई हलामी, ग्रामसेवक जयंत मेश्राम, पंचशील बौद्ध समितीचे सचिव खेमराज खोब्रागडे, एसएमसी सदस्य शेरसिंग हलामी, तिवारीलाल भोयर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने करण्यात आली. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, बूट व सॉक्सचे वितरण करण्यात आले. शाळेत उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी छायाचित्रे काढून प्रवेशोत्सवाचा आनंद लुटला.
यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका डी. वाय. मेश्राम यांच्या सेवापूर्तीनिमित्त निरोप समारंभ व सत्कार आयोजित करण्यात आला. शाळेविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या भावना अनावर झाल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
कार्यक्रमास प्रकल्प कार्यालय, गडचिरोलीचे संपर्क अधिकारी पराते उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी मुख्याध्यापक हर्षे, अधीक्षक भालेकर, अधीक्षिका कांबळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here