चंद्रपूर : सूर्यघर योजनेच्या ‘रिलीज ऑर्डर’साठी मागितली लाच, महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
The गडविश्व
चंद्रपूर, दि. ०२ : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सोलर सिस्टीमच्या कनेक्शनसाठी आवश्यक असलेली ‘रिलीज ऑर्डर’ देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या सिंदेवाही येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदये यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत दोन ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टीम बसवून दिली होती. या सिस्टीमचे महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यासाठी आवश्यक असलेली ‘रिलीज ऑर्डर’ काढण्यासाठी सहाय्यक अभियंता अमोद रंदये यांनी प्रत्येक ग्राहकामागे दोन हजार रुपये, असे एकूण चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट चंद्रपूर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर १ जुलै २०२६ रोजी सिंदेवाही येथे सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने अमोद रंदये यांना पंचांसमक्ष रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार व त्यांच्या सापळा पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #thegadvishva













