पुराडा जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर

60

पुराडा जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर
– ग्रामस्थांचे निवेदन, प्रशासनाकडून तातडीच्या नियुक्तीचे लेखी आश्वासन
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०२ : कुरखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुराडा येथील शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघटना, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात धाव घेत गटविकास अधिकारी धीरज पाटील व गटशिक्षणाधिकारी पविंद्र शिवणकर यांना निवेदन सादर केले.
भाजप तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये आणि सरपंच अशोक उसेंडी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शिक्षकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रशासनाने प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला तात्काळ पुराडा जिल्हा परिषद शाळेत रुजू करून घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थी संख्येनुसार कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, यापूर्वी १२ जून रोजी या विषयावर निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर २५ जून रोजी स्मरणपत्रही सादर करण्यात आले. तसेच गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, ३० जून रोजी शाळेत केवळ एका सर्वशिक्षा अभियानातील शिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने समस्या कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या सात वर्गांसाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासनाने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करून लेखी निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर मेश्राम, उपाध्यक्ष जोशना सलाम, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चेतन मेश्राम, हेमंतकुमार मडकाम, शंकर आकरे, सुभाष मेश्राम, कृष्णा कोसरे, पतीराज मेश्राम, इंदूताई टेकाम तसेच गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here