लॉयड्सच्या भव्य पदवीदान सोहळ्यात ४०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसह रोजगाराची संधी
– अमृता फडणवीस यांची उपस्थिती, गडचिरोलीसाठी फ्लाइंग स्कूल, महिला ट्रेलर चालक उपक्रमासह अनेक सामाजिक प्रकल्पांचे उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (एलएमजीएसई)च्या वतीने बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदवीदान सोहळ्यात विविध तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४०० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना लॉयड्स समूहामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या सोहळ्याला प्रसिद्ध बँकर व समाजसेविका अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन होते. यावेळी ज्येष्ठ लोकप्रतिनिधी अरविंद नामदेवराव पोरेड्डीवार, लॉयड्स फेरा फोर्ज ग्लोबल प्रा. लि.च्या संचालिका अलका मिश्रा, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्थी रेड्डी तसेच कार्यकारी संचालक एस. वेंकटेश्वरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस यांनी गडचिरोलीतील युवक-युवतींसाठी एलएमजीएसईच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कौशल्य विकासाच्या सुविधा आणि उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विशेषतः मुलींना तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे अभिनंदन करत, त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास हा या उपक्रमाच्या यशाचा खरा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीतील लॉयड्स-कर्टिन कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी इग्नासियस बडा याने ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठातून इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्याचा विशेष गौरव केला. त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च लॉयड्सने उचलला असून, स्थानिक आदिवासी युवकाने या क्षेत्रात परदेशातून उच्च शिक्षण घेणे हा गडचिरोलीसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने एलएमजीएसई कार्यरत असल्याचे सांगत प्रभाकरन यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना केवळ रोजगारच नव्हे, तर ईएसओपी (ESOP) योजनेअंतर्गत कंपनीचे समभाग देऊन त्यांना भागीदार बनविण्याचाही मानस व्यक्त केला.
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी लॉयड्स कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत त्यांनी हेडरी येथील बहुविशेषता रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याची माहिती दिली. तसेच महिला चालकांसाठी शौचालय सुविधेसह सुसज्ज ट्रेलर ट्रकचा अभिनव उपक्रम देशात प्रथमच सुरू करण्यात आल्याचे सांगून, भविष्यात गडचिरोलीत फ्लाइंग स्कूल सुरू करण्याची घोषणाही केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लॉयड्स एकलव्य वसतिगृह, लॉयड्स शक्ती वसतिगृह, लॉयड्स भोजनालय, लॉयड्स ड्रायव्हिंग स्कूल, लॉयड्स सक्षम गॅरेज तसेच लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्युअरशिपच्या अधिकृत संकेतस्थळाचे डिजिटल उद्घाटन करण्यात आले.













