मुनघाटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा ; ‘भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६’मध्ये प्लॅटिनम मानांकन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १६ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोलीद्वारे संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाने ‘भारत पर्यावरण कार्यक्रम – भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२६’ अंतर्गत प्लॅटिनम हे सर्वोच्च मानांकन मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. रिसर्च हाइट्स फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
जागतिक पृथ्वी दिनानिमित्त २२ ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान महाविद्यालयात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस ग्रीन ऑडिट, कचरा व्यवस्थापन, हरित परिसर निर्मिती, प्लास्टिकमुक्त अभियान, सस्टेनिबिलिटी जनजागृती तसेच कम्युनिटी आऊटरीच यांसारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आले.
स्पर्धेच्या नियमांनुसार सर्व उपक्रमांचे जिओ-टॅग फोटो पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य होते. महाविद्यालयाने ही प्रक्रिया काटेकोरपणे पूर्ण करत उत्कृष्ट कामगिरी नोंदविली. विद्यार्थ्यांनी शाश्वततेची शपथ घेत ऊर्जा बचतीवरील भित्तीपत्रके सादर केली, तर ‘शून्य प्लास्टिक मोहीम’ राबवून परिसरातील प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी जनजागृती केली.
कचरा व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा, जलसंधारण आणि हरित जीवनशैली यांसारख्या विषयांवर प्रभावी प्रबोधन करण्यात आले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या मिशनसाठी देशभरातील एक हजाराहून अधिक महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ५०० महाविद्यालयांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. कठोर व शिस्तबद्ध परीक्षण प्रक्रियेनंतर केवळ ३१८ महाविद्यालयांची प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्वर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये मुनघाटे महाविद्यालयाने प्लॅटिनम हा सर्वोच्च पुरस्कार पटकावून गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
या यशामुळे महाविद्यालय आता ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पार्टनर’ म्हणून रिसर्च हाइट्स फाउंडेशनसोबत कार्य करणार आहे. विविध संस्था आणि महाविद्यालयांना जोडून देशभरात शाश्वततेची चळवळ उभारण्याचे काम ही संस्था करीत आहे.
या पुरस्काराचे वितरण येत्या १ जून २०२६ रोजी हैदराबाद येथील ग्लोबल पीस सभागृह, गाचीबावली येथे होणार असून त्या शानदार सोहळ्याचे निमंत्रण महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे.
“विकसित भारत” संकल्पनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनाही पूरक असल्याचे मत प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्य समन्वयक म्हणून डॉ. दीपक बन्सोड यांनी काम पाहिले, तर डॉ. गुणवंत वडपल्लीवार, डॉ. भास्कर तूपटे आणि डॉ. राखी शंभरकर यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.














