‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती ही काळाची गरज

24

‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती ही काळाची गरज
– बालसुरक्षेसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याचे राकेश चव्हाण यांचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १६ : बालकांवरील वाढते लैंगिक अत्याचार, छेडछाड, अपहरण आणि विविध स्वरूपातील गुन्हे लक्षात घेता मुलांना ‘गुड टच-बॅड टच’ची माहिती देणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते राकेश चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
“मुलं म्हणजे देवाघरची फुलं” असे आपण म्हणतो, मात्र या फुलांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळणे तितकेच आवश्यक आहे. समाजात बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे पालक आणि नागरिकांमध्ये चिंता वाढत असून, अशा परिस्थितीत मुलांना स्वसंरक्षणाचे शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि शालेय स्तरावर लैंगिक शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गुड टच-बॅड टच’ म्हणजे सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श यातील फरक मुलांना समजावून सांगणे ही बालसुरक्षेची पहिली पायरी आहे. अंगणवाडी, नर्सरी ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लहान वयातच याबाबत जागरूक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनी मुलांना आपल्या शरीराविषयी माहिती देत कोणालाही विनाकारण स्पर्श करण्याचा अधिकार नसल्याची जाणीव करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
मुलांना अनुचित स्पर्श झाल्यास त्वरित “नाही” म्हणण्याचे धाडस, विश्वासातील व्यक्तीला माहिती देणे आणि संशयास्पद प्रसंगांपासून दूर राहणे शिकविणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. अनेकदा ओळखीची व्यक्तीच गोड बोलून मुलांचा विश्वास संपादन करते, त्यामुळे योग्य-अयोग्य स्पर्श ओळखण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
शाळांमध्ये ‘गुड टच-बॅड टच’ विषयावर सामूहिक समुपदेशन, शिक्षकांचे विशेष निरीक्षण तसेच नियमित जनजागृती उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा, स्कूल बस, शेजार किंवा सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या संशयास्पद हालचालींकडे पालक आणि शाळा व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची नैतिक जबाबदारी आहे. सुरक्षित बालपणासाठी ‘गुड टच-बॅड टच’ची माहिती घराघरांत पोहोचवून ती प्रभावी सामाजिक जनजागृती चळवळ बनविण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते राकेश चव्हाण यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here