मौशीखांब ग्रामपंचायतीचा ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ स्पर्धेत सहभाग
– विशेष ग्रामसभेत ठराव सर्वानुमते मंजूर
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०२ : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब ग्रामपंचायतीने ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या महत्वाकांक्षी अभियानात सहभागी होण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करत ग्रामविकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १ एप्रिल २०२६ रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर ग्रामसभा सरपंच तथा प्रशासक सौ. रंजिता पेंदाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपसरपंच तथा प्रशासकीय समिती सदस्य सौ. रुपाली गांधरवार, सदस्य विकास उंदिरवाडे, जयकुमार खेडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश दहलकर, उपाध्यक्ष हर्षे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या पदाधिकारी, उमेद अभियानाच्या सख्या तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांनी सभेचे संचालन करत शासनाच्या परिपत्रकानुसार ‘आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या अभियानाच्या माध्यमातून गावात आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे, रोगमुक्त व समृद्ध गाव उभारणे तसेच लोकसहभागातून आरोग्य चळवळ उभी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
मौशीखांब ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्पर्धेत सहभागी होण्याचा ठराव एकमुखाने मंजूर केला. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवा मार्ग खुला झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.














