‘सापनाथ-नागनाथ’ राजकारणापासून सावध रहा ; शेतकऱ्यांना डाव्या पक्षांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : जिल्ह्यात प्रस्तावित लोहखाणी व स्टील प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर डाव्या लोकशाही आघाडीने भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “सत्ताधारी भाजप आणि संधीसाधू काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या ‘सापनाथ-नागनाथ’ राजकारणाला बळी पडू नका,” असा इशारा देत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघर्ष उभारावा, असे मत व्यक्त करण्यात आले.
स्थानिक सर्कीट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत डाव्या आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, भेंडाळा, जैरामपूर, अडपल्ली, येवली-शिवणी परिसरात स्टील प्रकल्पांसाठी भूसंपादन सुरू असून शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. मात्र, रोजगाराच्या नावाखाली जिल्हा भांडवलदारांच्या हवाली करण्यात आल्याचा आरोप करत, या प्रक्रियेला भाजप आणि काँग्रेस दोघांनीही थेट किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या सुरजागड येथे एक लोहखाण सुरू असून वेलमागड–बुर्गी, झेंडेपार–आगरी–मसेली आदी ११ खाणी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. याशिवाय दमकोंडवाही, पुसेर–मुतनूरसह ४० हून अधिक ठिकाणी खनिज चाचण्या सुरू आहेत. या खाणींमधून निघणाऱ्या लोहधातूवर प्रक्रिया करण्यासाठी हेडरी, कोनसरी, वडलापेठा येथे स्टील प्रकल्प उभारले जात आहेत. मुधोली–जैरामपूर व भेंडाळा परिसरात भूसंपादनाची कार्यवाही वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जिंदाल, वरद फेरो अॅलॉयसह सुमारे ४० स्टील प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत असून ५० हून अधिक कंपन्यांची प्राथमिक चाचपणी सुरू आहे. अहेरी विभागात काही सिमेंट कंपन्यांनीही खाण व प्रकल्पांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या ५ ते ६ वर्षांत जिल्ह्यात शंभराच्या आसपास लहान-मोठे उद्योग उभारले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
या सर्व प्रकल्पांसाठी किमान १ लाख २० हजार एकर खासगी शेती जमीन भूसंपादीत होण्याची शक्यता असून, पायाभूत सुविधांसाठी आणखी २५ ते ३० हजार एकर जमीन लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. याशिवाय विविध खाणींमुळे दीड लाख एकरांहून अधिक जंगल क्षेत्र धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. “जिल्ह्यातील ६५ ते ७० टक्के शेती जमीन पुढील काळात भूसंपादनाच्या कक्षेत येऊ शकते,” असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला.
डाव्या आघाडीने आरोप केला की, खाणविरोधी आंदोलनांना भाजपने उघड पाठिंबा दिला नाही, तर काँग्रेसने आडमार्गाने खाण कंपन्यांना साथ दिली. आता भूसंपादनाचा प्रश्न तीव्र झाल्यावर दोन्ही पक्ष शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचा आव आणत असल्याची टीका करण्यात आली. २०२२ मधील एट्टापल्ली येथील आंदोलनाचाही उल्लेख करत काही नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
शेतकऱ्यांनी प्रस्तावित लोहखाणी आणि ‘गडचिरोली जिल्हा खनिज विकास प्राधिकरणा’विरोधात एकत्र येऊन लढा उभारावा, तसेच खाण समर्थक पक्षांना नाकारावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य काॅ. डॉ. महेश कोपूलवार, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, आसपा प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम,भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, ॲड. जगदीश मेश्राम, काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सुरज जक्कुलवार, कविता ठाकरे, कविता मेश्राम, चंद्रकांत भोयर, डाॅ. धर्मराज सोरदे, प्रमोद कोसेकर, रमेश मेश्राम, विवेक खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सुरेंद्र वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ipl2026














