मोहफुले वेचायला गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

47

मोहफुले वेचायला गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
The गडविश्व
नागभीड, दि. ०५ : तालुक्यातील मींथुर येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरिदास महादेव कुबडे (वय ५८) असे मृत इसमाचे नाव असून, शनिवार (दि. ४) सकाळी ते शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. संध्याकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सुमारे सहा वाजताच्या सुमारास त्यांचा पुतण्या अक्षय कुबडे शेताकडे गेला असता त्याला वाघांची जोडी व तीन बछडे दिसून आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या अक्षयने तातडीने गावात परत येत ग्रामस्थ, वनविभाग व पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे पथक व नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली मात्र हरिदास कुबडे यांचा काहीही मागमूस लागला नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचा संशय अधिक बळावला.
रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असता शेतात कुबडे यांचे अवयव विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. वाघाने हल्ला करून शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. परिसरात चार ते पाच वाघांचा वावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी बगमारे यांनी मृतदेहाचे अवशेष ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून, पुढील तपास वनविभाग व नागभीड पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chandrpurnews #nagbhid #tigerattack #TigerAttack #FarmerDeath #Nagbhid #Chandrapur #WildlifeConflict #HumanWildlifeConflict #MaharashtraNews #BreakingNews #VillageNews #ForestDepartment #TigerTerror #RuralIndia #TragicIncident #WildlifeAttack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here