कुरखेडा : विद्यार्थ्याच्या मृत्यूने हादरलेली आश्रमशाळा, आमदार मसराम यांची तातडीची भेट
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०५ : तालुक्यातील वडेगाव येथील क्रांतीवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, दुसरीत शिकणाऱ्या वेदांत पदा (वय ८) या विद्यार्थ्याचा शाळेजवळील तलावात बुडून मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी ४ एप्रिल रोजी आश्रमशाळेला भेट देत घटणास्थळाची पाहणी केली व शाळा प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली.
पाहणीदरम्यान आश्रमशाळेतील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट होताच मसराम यांनी प्रशासनाला कडक सूचना देत, “आदिवासी निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असून, कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. तसेच शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी गडचिरोली येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची तत्काळ तपासणी करण्याचे आदेश दिले. याशिवाय, ज्या तलावात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, ज्येष्ठ नेते आनंदराव जांभूळकर, माजी सरपंच संजय कोरेटी, माजी नगरसेवक उस्मान पठाण, भावेश मुंगनकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक गिरीपूंजे आदी उपस्थित होते.














