गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई ; अवैध दारूसाठा, ३ चारचाकींसह २६.२५ लाखांचा ऐवज जप्त
– आरमोरीत धाड, दोन आरोपी अटकेत
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. आरमोरी शहरातील आझाद चौक परिसरात टाकलेल्या छाप्यात देशी, विदेशी व हातभट्टी मोहा दारूसह ३ चारचाकी, एक दुचाकी आणि एकूण २६ लाख २५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार आरमोरी पोलिसांनी २९ जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिओ टॉवरजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचला. कारवाईदरम्यान प्रवीण भाऊराव खोब्रागडे (३१) व रुपेश रेखचंद ठवरे (२९) हे संशयित पोलिसांच्या ताब्यात आले. चौकशीत जवळ उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा लपवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
पंचासमक्ष वाहनांची तपासणी केली असता विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, देशी दारू, बिअर तसेच ४० लिटर हातभट्टी मोहा दारू असा ६ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा टीयूव्ही-३००, निसान मॅग्नाईट, महिंद्रा स्कॉर्पिओ ही तीन चारचाकी वाहने आणि सुझुकी बर्गमन स्ट्रीट दुचाकीही जप्त करण्यात आली. वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २६ लाख २५ हजार ९०० रुपये आहे.
या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल कैलास टेंभुर्णे हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे करीत आहेत.
दरम्यान, गडचिरोली पोलीस दलाने अवैध दारूविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत असून जून २०२६ महिन्यात जिल्हाभरात अवैध दारू विक्री व वाहतूक प्रकरणी २८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये १ कोटी ९४ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













