केहकावाहीत महाराजस्व समाधान शिबिर; विविध दाखल्यांचे वाटप

21

केहकावाहीत महाराजस्व समाधान शिबिर; विविध दाखल्यांचे वाटप
– उत्पन्नाचे ५२, सातबारा १२ दाखले वितरित; निराधार योजनेचे ५ प्रस्ताव, रेशनकार्डच्या ३५ प्रकरणांची नोंद
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०१ : तालुक्यातील ग्रामपंचायत पन्नेमारा अंतर्गत केहकावाही येथे तहसील कार्यालय, धानोरा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महाराजस्व समाधान शिबिर सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) घेण्यात आले. शिबिरात विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारून नागरिकांना योजनांची माहिती देतानाच त्यांच्या विविध प्रशासकीय अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तहसीलदार माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिबिराला नायब तहसीलदार वाळके, पन्नेमारा ग्रामपंचायतीच्या सरपंच शेवंताबाई हलामी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दुबे, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा, केंद्रप्रमुख विनय रामटेके यांच्यासह आरोग्य, वन व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरादरम्यान नागरिकांना उत्पन्नाचे ५२ व सातबारा उताऱ्याचे १२ दाखले वितरित करण्यात आले. तसेच श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे ५ प्रस्ताव तयार करण्यात आले, तर रेशनकार्डसाठी ३५ प्रकरणांची नोंद करण्यात आली. विविध विभागांच्या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.
दरम्यान, पन्नेमारा सरपंच शेवंताबाई हलामी यांनी मुरुमगाव ते केहकावाही रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून ग्रामीण भागातील रस्त्यांची समस्या तातडीने दूर करण्याची मागणी केली. दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिबिराला केहकावाही व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here