घरकुल, नालासफाई अन् पाणीपुरवठ्यावरून कोंढाळ्यात जनआक्रोश; शेकडो ग्रामस्थांचा मोर्चा

21

घरकुल, नालासफाई अन् पाणीपुरवठ्यावरून कोंढाळ्यात जनआक्रोश; शेकडो ग्रामस्थांचा मोर्चा
– कथित गैरप्रकारांच्या चौकशीसह विविध मागण्या; संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे दहा दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन
The गडविश्व
देसाईगंज, दि. ०१ : कोंढाळा ग्रामपंचायतीतील घरकुल, नालासफाई, पाणीपुरवठा आणि शौचालयाच्या कामातील कथित गैरप्रकारांसह विविध प्रलंबित प्रश्नांवरून ग्रामस्थांचा संताप मंगळवारी रस्त्यावर आला. गावातील युवकांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला, पुरुष आणि युवकांनी जनआक्रोश मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर दहा दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
२० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून घरकुलाची यादी मंजूर करण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दहा दिवस उलटूनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली. याच पार्श्वभूमीवर युवकांनी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले.
गावातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून त्याची अद्याप साफसफाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पावसाळ्यात नाल्यांची दुरवस्था कायम राहिल्याने अस्वच्छता आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गावासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी अनेक नळांना नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे मोठा खर्च करूनही नागरिकांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
शौचालयाच्या कामातही कथित गैरप्रकार झाल्याचा मुद्दा युवकांनी ग्रामसभेत उपस्थित केला होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच घरकुल, नालासफाई आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा विविध मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
ढोल-ताशांच्या गजरात शांततापूर्ण पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चादरम्यान मोठ्या संख्येने महिला व पुरुषांसह युवक सहभागी झाले होते.
पंचायत समिती देसाईगंजचे संवर्ग विकास अधिकारी ठाकरे आणि विस्तार अधिकारी आडे यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. मागण्यांचा सविस्तर विचार करून येत्या दहा दिवसांत आवश्यक कार्यवाही केली जाईल, तसेच संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मोर्चाचे नेतृत्व सतीश गिरीधर चौधरी, शेखर राऊत, नंदकिशोर ढोरे, रोहित चंदपूरकर, जयानंद बुल्ले, सौरभ बुराडे, गोकुळदास ठाकरे, नितेश पाटील, नामदेव वसाके, आदित्य चौधरी, कांतीलाल शेंडे, ज्ञानेश्वर चौधरी, भीमराम जनबंधू, बाबू पठाण, राजकुमार शेंडे, प्रशिक मेश्राम, गुरुदेव मेश्राम, मयूर रायसिडाम, जयंत बोरुले आणि शेषराव नागमोती यांच्यासह गावातील युवकांनी केले.
मोर्चाला ज्येष्ठ नागरिक पंढरी नखाते, वासुदेव ठाकरे, भास्कर पत्रे, एकनाथ पत्रे, पवन खोब्रागडे, सुनील पारधी, दिगंबर भजनकर, रवींद्र शेंडे, अरुण सहारे, आनंदराव बेदरे, मनोहर मडावी, आसाराम भजनकर, प्रभाकर चौधरी, दादाजी बुराडे, सुरेखाबाई बुराडे आणि रोशनीताई पारधी यांच्यासह शेकडो महिला व पुरुषांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here