गणेशोत्सवासाठी गडचिरोली पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; ५०० हून अधिक मंडळांशी संवाद

9

गणेशोत्सवासाठी गडचिरोली पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; ५०० हून अधिक मंडळांशी संवाद
– कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या उपद्रवींवर कठोर कारवाई; ‘एक गाव, एक गणपती’ राबविण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकी’चे आयोजन करण्यात आले. संस्कृती सभागृह, गडचिरोली येथे झालेल्या या बैठकीत जिल्हाभरातील ५०० हून अधिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, विसर्जन मिरवणुका, ध्वनिक्षेपकाचा वापर, विद्युत सुरक्षा, महिला व बालकांची सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात सोशल मीडियावरून अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले. अशा प्रकारची माहिती आढळल्यास ती पुढे प्रसारित न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही सांगण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि मिरवणुका सुरक्षित व सुरळीत पार पडाव्यात, यासाठी गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाशी आवश्यक समन्वय ठेवावा, असे निर्देश देण्यात आले. संवेदनशील ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

‘माओवाद संपल्यानंतरचा पहिला मोठा उत्सव’

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गणेशोत्सव अधिक जल्लोषात, मात्र शांतता आणि शिस्तीच्या वातावरणात पार पाडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
गणेश मंडळांनी शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडप तसेच मिरवणुकीच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अनुचित प्रकारांना थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच जिल्ह्यात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करताना, गैरकायदेशीर कृत्ये आणि अवैध धंदे करणाऱ्या उपद्रवी तसेच समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचा इशारा त्यांनी दिला.
बैठकीस सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, सहायक पोलीस अधीक्षक धानोरा सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक भामरागड सागर भामरे, जिविशाचे पोलीस निरीक्षक विशाल काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here