शिष्यवृत्ती परीक्षेत लोकेश मोहुर्लेचे घवघवीत यश
– जि.प. हायस्कूल धानोऱ्याच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा अंतरिम निकाल जाहीर झाला असून, जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील विद्यार्थी लोकेश राजेंद्र मोहुर्ले याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात शाळेतील एकूण १८ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी लोकेश मोहुर्ले याने यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण करून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळविली. त्याला इयत्ता नववी ते दहावी या दोन वर्षांच्या कालावधीत दरमहा ७५० रुपये प्रमाणे प्रतिवर्ष ७५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशाबद्दल शाळा परिवाराच्या वतीने लोकेशचा सत्कार करण्यात आला. त्याचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी केले.
लोकेशने आपल्या यशाचे श्रेय गुरुजन आणि आई-वडिलांना दिले आहे.














