कोरची : धानाचे चुकारे रखडले, बोनससाठी काँग्रेस आक्रमक

11

कोरची : धानाचे चुकारे रखडले, बोनससाठी काँग्रेस आक्रमक
– तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. १९ : कोरची तालुका हा आदिवासीबहुल व अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश नागरिकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन भातशेती असताना खरीप हंगाम २०२५-२६ मधील धान विक्रीचे चुकारे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर धानाचे थकीत चुकारे तात्काळ अदा करावेत, धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करावा तसेच रब्बी हंगाम २०२६ च्या ऑनलाईन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, या मागण्यांसाठी कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धानाचे पैसे रखडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज भरणेही कठीण झाले आहे. आगामी हंगामासाठी शेतीचे नियोजन कसे करावे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे चुकारे त्वरित अदा करावेत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करावा व रब्बी हंगाम २०२६ साठी सुरू असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास कोरची काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष रामसुराम काटेंगे, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रविकुमार नंदेश्वर, मदन हिडामी, संपत धूर्वे, मेहतरू घाटघूमर, बस्तर होळी, राधेश्याम दरवडे, चमरू कल्लो, राजाराम नैताम, पुनाराम सोनवाणी, भिकम फुलकुवर, हेमकृष्ण सुवा, रमेश होळी, बाबूलाल शेंडे यांच्यासह अनेक शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here