धान खरेदी केंद्र रखडल्याने शेतकरी चिंतेत; तात्काळ उपाययोजनांची मागणी

8

धान खरेदी केंद्र रखडल्याने शेतकरी चिंतेत; तात्काळ उपाययोजनांची मागणी
– आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांचे प्रशासनाला निवेदन
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात रब्बी हंगामातील धान उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार झाले असून शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी प्रशासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून खरेदी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
मागील खरीप हंगामातील धानाची अद्याप उचल न झाल्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना नवीन धान खरेदी केंद्र सुरू करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामांमध्ये रब्बी हंगामातील धान खरेदी करण्याचे निर्देश दिले असले, तरी जुन्या धानाची उचल रखडल्याने नवीन खरेदी प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे.
धान खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने मागील धानाची उचल करून नवीन धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चांगदेव फाये यांनी केली आहे.
तसेच शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन धान खरेदी प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षाही शेतकरी व सहकारी संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here