नक्षलवाद्यांचा मोठा गट मुख्य प्रवाहात : १०८ जणांचे आत्मसमर्पण, एक किलो सोने व १०१ शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन

109

नक्षलवाद्यांचा मोठा गट मुख्य प्रवाहात : १०८ जणांचे आत्मसमर्पण, एक किलो सोने व १०१ शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन
The गडविश्व
विशेष प्रतिनिधी / जगदलपूर, दि. ११ : बस्तर विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर येथे नक्षलवादाविरोधातील लढ्यात महत्त्वाची घडामोड घडली असून १०८ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर सामूहिक आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या या नक्षलवाद्यांवर मिळून ३ कोटी ९५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. विशेष म्हणजे आत्मसमर्पणाच्या वेळी नक्षलवाद्यांनी एक किलो सोने, ३ कोटी ६१ लाख रुपयांची रोकड तसेच १०१ विविध प्रकारची शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी ही मोठी रक्कम लेवी वसुलीद्वारे जमा केली होती. आत्मसमर्पणापूर्वी संबंधित नक्षलवाद्यांनी थेट बस्तर पोलिसांशी संपर्क साधत आपल्या ताब्यात मोठ्या प्रमाणात रोकड व सोने असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिकृत आत्मसमर्पण कार्यक्रम आयोजित केला.
आत्मसमर्पणाच्या वेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. यामध्ये ७ एके-४७, १० इंसास रायफल, ५ एसएलआर रायफल, ४ एमजी रायफल, २० नग .३०३ रायफल तसेच ११ बीजीएम लॉन्चर यांचा समावेश आहे.
या आत्मसमर्पण कार्यक्रमाला बस्तर विभागातील सात जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक तसेच राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित होते. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी दंडकारण्य क्षेत्रात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आत्मसमर्पणानंतर पोलिसांकडून संबंधित नक्षलवाद्यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून सोने कुठून मिळाले, लेवीची रक्कम कोणाकडून वसूल केली जात होती तसेच आर्थिक पुरवठा कोण करत होते, याबाबत तपास सुरू करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जंगलात सक्रिय असलेल्या उर्वरित नक्षलवाद्यांना शासनाच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ घेत मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कांकेर जिल्ह्यातील कोयलीबेड़ा परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here