‘लाडकी बहीण’ योजनेची केवायसी बंद ; प्रक्रिया पूर्ववत करण्याची मागणी

67

‘लाडकी बहीण’ योजनेची केवायसी बंद ; प्रक्रिया पूर्ववत करण्याची मागणी
– केवायसीअभावी शेकडो पात्र महिलांचे लाभ रखडलेz निवेदन देत आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : जिल्ह्यातील शेकडो पात्र महिलांचे ‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभ केवळ केवायसी प्रक्रिया बंद असल्यामुळे रखडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी होत नसल्याने त्यांना योजनेच्या आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांच्या नेतृत्वात महिलांनी मंगळवारी जिल्हा परिविक्षा अधिकारी गजानन पडघन यांना निवेदन सादर करून केवायसी प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सर्व निकष पूर्ण करून अर्ज दाखल केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केवायसीची लिंक किंवा संबंधित प्रक्रिया बंद असल्याने अर्जांची पुढील पडताळणी रखडली आहे. परिणामी, पात्र असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा होऊ शकलेली नाही.
ग्रामीण व शहरी भागातील गरजू महिलांना यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून केवायसी प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी तसेच केवळ केवायसीअभावी प्रलंबित असलेल्या अर्जांची विशेष मोहीम राबवून पडताळणी पूर्ण करून लाभ वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील वंचित महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन सादर करताना रुपेश वलके यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here