कुरखेडा : तेंदूपत्ता संकलनादरम्यान रानडुकराचा हल्ला, महिला मजूर गंभीर जखमी
– आमदार रामदास मसराम यांनी रुग्णालयात भेट देत उपचारांची घेतली माहिती
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १२ : तालुक्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम जोरात सुरू असून जंगल परिसरात मजुरांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. अशातच मौशी गावाजवळील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिला मजुरावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. १२ मे) सकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विद्या ताराचंद चांभारे (वय ३५, रा. मौशी) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मौशी येथील महिला व पुरुष मजूर नेहमीप्रमाणे सकाळी तेंदूपत्ता संकलनासाठी गावालगतच्या जंगल परिसरात गेले होते. दरम्यान, अचानक एका रानडुकराने विद्या चांभारे यांच्यावर हल्ला चढविला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सोबत असलेल्या इतर मजुरांनी तत्काळ धाव घेत आरडाओरड केल्याने रानडुकराने जंगलाच्या दिशेने पळ काढला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्या चांभारे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य जयंत पाटील हरडे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबाबत निर्देशही दिल्याची माहिती मिळाली.














