मध्यरात्री कुरखेडा वनपथकाची धाड ; अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, गुन्हा दाखल
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. १२ : अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कुरखेडा वनविभागाने धडक कारवाई करत मध्यरात्री रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त केला. चारभट्टी नियतक्षेत्रात ९ मे २०२६ रोजी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
वनपरिक्षेत्र कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या चारभट्टी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७४ मध्ये अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला.
कारवाईदरम्यान धानोरी येथील धनंजय गोमाजी बन्सोड यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-33-AC-4341 अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आला. वनपथकाने तत्काळ ट्रॅक्टर ताब्यात घेत संबंधिताविरुद्ध वनगुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पलसगडचे क्षेत्रसहाय्यक बी. बी. तुलावी, वनरक्षक मुकेश सयाम (चारभट्टी), के. के. काशिवार (पलसगड), एम. के. दूधबळे (वडेगाव), वनमजूर मधुकर दरवडे तसेच वाहनचालक चेतन कुमरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, वनसंपदेची हानी करणाऱ्या तसेच अवैध रेती उत्खननात सहभागी असणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा वनपरिक्षेत्रामार्फत सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #kurkhedanews #kurkhedaforest














