The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) : कृषीपंप तसेच घरगूती विद्युत वाहीणीवर मागील काही दिवसांपासून सूरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे येथील त्रस्त हजारोंच्या संख्येत उपस्थित शेतकऱ्यांनी आज गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथे शासन व विद्युत कंपनी विरोधात गगणभेदी घोषणाबाजी करीत मोर्चा काढला व कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सूरू केले.
तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मनमानी पद्धतीने विद्यूत विभागाचा वतीने भारनियमन सूरू आहे. घोषित भारनियमन कालावधी होऊनही अनेक ठिकाणी वारंवार होणाऱ्या विद्युत बिघाडामूळे सूद्धा विद्युत पूरवठा बंद असतो त्यामुळे विद्युत कृषी पंप बंद पडत रब्बी धान हंगाम धोक्यात आला आहे. त्यामूळे संतप्त शेतकऱ्यांनी आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना (उबाठा) कडून पुकारण्यात आलेल्या मोर्चा व ठिय्या आंदोलनात हजारोंच्या संख्येत सहभागी होत उपविभागीय कार्यालय समोर आयोजित ठिय्या आंदोलनात विज वितरण कंपनी व शासनाच्या विरोधात तिव्र शब्दात रोष प्रकट केला.
यावेळी मोर्चेकरूंचे निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलन स्थळी आलेले गडचिरोली येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांना रोषाचा सामना करावा लागला. कुरखेडा येथील उपविभागीय विद्युत अभियंता मिथून मूरकूटे व कढोली येथील शाखा अभियंता झोडापे यांच्या विरोधात तिव्र रोष होता मात्र ते आंदोलन स्थळी फिरकलेच नाही त्यामूळे अनूचीत प्रसंग टळला. यावेळी पूर्ववत येथील विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्याच्या मागणी करीता मोर्चेकरू अडून बसले होते व विद्युत विभाग व शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर उपस्थीत कार्यकारी अभियंता यांच्याशी भ्रमनध्वनीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चेकरूंचा समक्षच संपर्क साधला व कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी तालुक्यात भारनियमन संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत करण्यात येणार नाही तसेच दिवसा फक्त ४ तास कृषी पंपावर भारनियमन करण्यात येईल अशी लिखीत घोषणा केल्यावर शेतकऱ्यांचे समाधान होत आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व विधान परिषद सदस्य आ.अभिजीत वंजारी, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष आशिष काळे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी प.स. सभापती गिरीधर तितराम, महिला काँग्रेस ता अध्यक्ष आशाताई तुलावी आदि हजर होते.