महाडीबीटी पोर्टल तातडीने सुरू करून दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांचे मानधन पूर्ववत करा
– चांगदेव फाये यांची राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे मागणी
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०५ : तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांचे बंद झालेले मानधन पूर्ववत सुरू करावे तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन नियमितपणे मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 मार्च 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासन स्तरावर संबंधित लाभार्थ्यांना पुन्हा मानधनाचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले महाडीबीटी पोर्टल अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने अनेक पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मानधनाचा लाभ मिळू शकलेला नाही.
या गंभीर समस्येबाबत विकलांग संघटनेचे पदाधिकारी यशवंत पाटणकर यांनी चांगदेव फाये यांचे लक्ष वेधले. त्यानंतर चांगदेव फाये यांनी तातडीने या प्रश्नाची दखल घेत सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले आणि लाभार्थ्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी केली.
यावेळी त्यांनी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित मानधन सुरू करण्यासाठीही महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करणे अत्यावश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले. सध्या पोर्टल बंद असल्यामुळे दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले असून अनेक गरजू नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाभ मिळावा म्हणून लाभार्थी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र पोर्टल बंद असल्याने त्यांची कामे रखडली असून ते शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत.
यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने तातडीने आवश्यक निर्देश देऊन महाडीबीटी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे तसेच तात्पुरत्या दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांचे मानधन पूर्ववत सुरू करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे केली.













