कोरची–कुरखेडा मार्गावरील घाटात भीषण अपघात ; अनियंत्रित ट्रकच्या धडकेत नव्याकोऱ्या टाटा पंचसह महिंद्रा SUVचा चक्काचूर
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०५ : कोरची–कुरखेडा मार्गावरील घाटात भरधाव व अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा SUV आणि नुकतीच खरेदी करण्यात आलेल्या टाटा पंच या दोन वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अपघातात काळ्या रंगाच्या महिंद्रा SUV च्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. वाहनाचे इंजिन, बोनेट आणि विंडस्क्रीन पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले असून वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चिरडल्यासारखा झाला आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त टाटा पंच ही गाडी नुकतीच शोरूममधून खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. वाहनावर पूजेचे रिबन तसेच तात्पुरता पासिंग क्रमांक असल्याने ती नव्याकोरी असल्याचे दिसून येत आहे. ट्रकच्या जोरदार धडकेनंतर टाटा पंच रस्त्याच्या कडेला असलेल्या मेटल क्रॅश बॅरियरवर जाऊन आदळली. या वाहनाच्याही पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताचा भीषण आवाज ऐकून परिसरातील नागरिक तसेच मार्गावरील प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
कोरची–कुरखेडा मार्गावरील घाटात तीव्र वळणे, अरुंद रस्ता आणि अवजड वाहनांचा वेग यामुळे अपघातांचा धोका कायम असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची अधिकृत संख्या तसेच त्यांची वैद्यकीय स्थिती याबाबत पोलीस प्रशासनाकडून सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #kurkheda #korchi #truckaccident #tata













