कायम करा नाहीतर इच्छामरण : कस्तुरबा विद्यालय कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

39

कायम करा नाहीतर इच्छामरण : कस्तुरबा विद्यालय कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०८ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, असा तीव्र इशारा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा येथील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या मागणीसंदर्भात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना ६ एप्रिल रोजी निवेदन सादर करण्यात आले.
समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यभरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणासह विविध आंदोलन छेडत आहेत. गेल्या २० वर्षांपासून अत्यल्प मानधनावर काम करूनही शासनाने एकही ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील पालघर, गडचिरोली, नंदूरबार, नाशिक, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड व कोल्हापूर या १० जिल्ह्यांतील एकूण ४३ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये मुख्याध्यापिका, गृहपाल, शिक्षक, लेखापाल व इतर कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. अनेकांची सेवा केवळ ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीत संपुष्टात येत असल्याने नोकरीची असुरक्षितता अधिक तीव्र झाली आहे. मागील चार वर्षांत सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त झाल्याची बाबही समोर आली आहे.
दरम्यान, ४ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठका (२५ जून, २२ ऑगस्ट व ४ सप्टेंबर २०२५) पार पडल्या असल्या तरी अहवाल अद्याप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयान्वये काही कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले असताना उर्वरित कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना तीव्र होत आहे.
“कंत्राटी जीवन आता नकोसे झाले आहे. कुटुंबाच्या आरोग्य, शिक्षण व आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाने तातडीने निर्णय घेऊन आम्हाला कायम करावे, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी,” असा आक्रोश कर्मचाऱ्यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.
या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here